आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; विरोधकांकडून विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न
नागपूर | आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी होणार आहे. केवळ एकच आठवड्यात अधिवेशन एकाच आठवड्यात संपणार असल्याने विरोधकांकडून विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे पाहिल्यांदाच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत, कायद्यात नसतानाही दोन उपमुख्यमंत्री आहेत, मग दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते का नाहीत असा सवाल केला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं या मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा हल्लाबोल या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.


दरम्यान, विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात उल्लेखही करण्यात आलेला नाही. मात्र विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेल आहे. यावर विरोधी पक्षनेते ठरविण्याचा अधिकार विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्षांचा असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता
आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. शासकीय कामकाज होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. याशिवाय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार असून यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनाचे 15 धरणे आंदोलन होणार असल्याने या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधला जाऊ शकतो. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाचा घोळ आणि शेतकरी प्रश्नांवरुन हे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.