जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

0

जळगाव । मध्य रेल्वेच्या जळगाव आणि भुसावळसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामागचं कारण म्हणजे महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १० प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. हे निर्बंध ५ व ६ डिसेंबर या दोन दिवसांसाठी असतील.

भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला आणि बडनेरा या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती प्रतिबंधित असेल. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. विशेष गाडी क्रमांक ०१२६० नागपूर येथून ०४ डिसेंबर रोजी १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ०४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपुर येथून ५ डिसेंबर रोजी ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावल, जलगांव, चाळिसगांव, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबा राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.