मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. मात्र अशातच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर यते आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचे लग्न मंगळवारी रात्री पार पडले. या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. दोन्ही नेते हसत खेळत चर्चा करत होते. यावेळी आशिष शेलार हे देखील त्यांच्यासोबत होते.


संजय राऊत यांना गंभीर आजार झाला असून ऑक्टोबरमध्ये त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. आजारावर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. हे उपचार सुरू असतानाच एका महिन्यानंतर संजय राऊत यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपचाराचा १ महिना पूर्ण झाला असून आणखी एक महिना उपचार सुरू राहणार असल्याचे सांगितले होते.