महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख समोर, वाचा कधी उडणार धुरळा
मुंबई । महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगर पालिकांसाठी निवडणुका दि २ डिसेंबर रोजी झाल्या असून आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुका म्हणजेच जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाननुसार राज्यात 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे राज्यात महानगरपालिका आणि जिल्ह्यापरिषदेच्या निवडणुका कधी होणार? याबाबत अनेक तक्रवितर्क लावण्यात येत आहे.
अशातच राज्यात महापालिका निवडणुका या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी होणार असून या निवडणुकीची संभाव्य तारीख देखील समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.


तर दुसरीकडे 32 पैकी 17 जिल्हापरिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादाचे पालन न झाल्याने या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. 10 डिसेंबर रोजी महापालिकांची प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम होणार असून त्याचा आढावा राज्य निवडणूक आयोग घेणार आहे आणि यानंतर पुढील चार- पाच दिवसात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
कधी होणार महापालिका निवडणूक?
राज्यात 2 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार मात्र त्यापूर्वीच 15 किंवा 17 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग राज्यात महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, राज्यात 15 डिसेंबर ते 10 जानेवारीदरम्यान महापालिका निवडणुका होणार आहे. तर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीसाठी 5 ते 30 जानेवारी दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे.