तेलंगणातून नातेवाईकांच्या लग्नासाठी जळगावला निघालेलं दाम्पत्य बेपत्ता
जळगाव । तेलंगणा राज्यातील सीतापूरम येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्यासाठी आपल्या खाजगी कारने निघालेलं दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत या दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील (राजपूत) हे सीतापूरम (तेलंगणा) येथे खासगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते त्यांच्या पत्नी नम्रतासह कारदारे (एमएच-१३- बीएन-८५८.३) ने जिल्ह्यातील जळगाव डोकलखेडा येथील लग्नासाठी रवाना झाले होते. २७ नोव्हेंबरला सायंकाळी ६:३० वाजता त्यांचा नातेवाइकांशी शेवटचा फोनवरील संवाद झाला. दरम्यान, नातेवाईक जळगावला पोहोचले, मात्र पाटील दाम्पत्य न आल्याने चिंता व्यक्त झाली. वारंवार फोन करूनही दोघांचेही मोबाइल स्विच ऑफ असल्याचे आढळून आले.


यानंतर नातेवाइकांनी महामार्गावरील अनेक गावांमध्ये चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासात दाम्पत्याची गाडी दि. २७ रोजी संध्याकाळी (७:११) वाजता बाळापूरजवळील तरोडा टोल नाका ओलांडताना दिसून आली. त्यानंतर त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी (ता. नांदुरा) येथे आढळले. मात्र, त्यानंतर दाम्पत्याचा कोणताही शोध लागला नाही. महामार्गावर कोणताही अपघात नोंदलेला नसल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
दाम्पत्याचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली. पीआय जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी तपासाला गती दिली. २८ नोव्हेंबरला दोन स्वतंत्र पथकांनी नांदुरा-मलकापूर दरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. दाम्पत्य बेपत्ता झाल्याची माहिती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.