१५ हजाराची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखकला अटक
जळगाव । धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जळगावमध्ये मोठी कारवाई केली. पेट्रोलपंपाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपये लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहितनगर, जळगाव रोड, भुसावळ) याला रंगेहाथ अटक केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदाराने आपल्या पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून संबंधित कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या प्रक्रियेच्या दरम्यान आरेखक पाथरवट याने प्रथम २ हजार रुपये ‘खुशाली’साठी व काम पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराने ही मागणी मान्य न करता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.


सोमवारी रात्री पाथरवट यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान रक्कम आणि संबंधित पुरावे जप्त करण्यात आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.