जळगाव जिल्ह्यात भाजपने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खाते उघडले; जामनेरमध्ये साधना महाजन यांची बिनविरोध निवड

0

जामनेर । भाजपाला जळगावच्या जामनेरमध्ये मोठे यश आले आहे. जामनेर नगर परिषदमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर जामनेगरमध्ये गुलालाची उधळण केली जात असून जल्लोष साजरा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक बिनविरोधच व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते. आता महाजन यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. या निवडणुकीतील विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज (20 नोव्हेंबर) माघार घेतली आहे. त्यामुळे आता साधना महाजन यांचा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. परंतु आता या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे. उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील, आणि नानाभाऊ बाविस्कर अशी आतापर्यंत बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतली असून 27 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.