भाजपकडून’ दादा’ अन् ‘भाईं’ना घेरण्याचा प्रयत्न? राजकीय खेळीने टेन्शन वाढलं!
मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतच मोठ्या राजकीय घडामोडींनी मित्र पक्षांना धक्का दिला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपकडून चक्रव्यूहात अडकविण्याठी भाजपकडून दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना गळाला लावले जात आहे.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमयरित्या भाजपमधील पक्षप्रवेशांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या राजकीय खेळीने शिवसेना आणि राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर उमटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित ठाणे जिल्ह्यात म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील अनेक मोठ्या नेत्यांना पक्ष प्रवेश दिला जात आहे. या पक्ष प्रवेशाच्या सपाट्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्था पसरली असून त्यांनी काल झालेल्या मंत्री मंडळ बैठकला बहिष्कार टाकला असल्याची माहिती समोर आली.


बैठकीला शिवसेनेचे चार मंत्रे अनुपस्थित होते. तर एकनाथ शिंदेंनी उपस्थिती दर्शवली होती. यावर बोलताना शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले. पण तरीही नाराजीची चर्चा झालीच. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाशिक जिल्ह्यातील मंत्र्यांना विधानसभेत आव्हान देणाऱ्या नेत्यांनाच थेट भाजपने पक्षात घेतले आहे. त्यामुळे केवळ शिंदेचं नाही तर दादांनाही घेरण्याची योजना भाजपने आखल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
भाजपने नाशिकमध्ये आक्रमक मोहिम सुरू केली असून, प्रदेशाध्यांबरोबरच मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेनेचे एकमेव जिल्हा मंत्री दादा भुसे यांच्यावरही राजकीय डाव टाकला आहे. भुसेंच्या कट्टर विरोधकांना भाजपमध्ये घेत गिरीश महाजन यांनी भुसेविरोधी राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काका हेमंत वाजे यांना भाजपमध्ये घेऊन राष्ट्रवादीचे मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारालाच महाजन यांनी थेट आव्हान दिले आहे. मालेगावमध्ये माजी आमदार अपूर्व हिरे आणि प्रसाद हिरे यांना भाजपमध्ये दाखल झाले आहेत. उदय सांगळे, सुनीता चारोस्कर यांना पक्षात घेत नरहरी झिरवाळ यांच्यासमोर आव्हान उभे केले असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे टेन्शन वाढले
कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अॅापरेशन कमळ राबविले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाराजीचा फायदा भाजपने घेतला असून पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी करत पक्षात आणले आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षातील नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेण्यात आले. तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांच्या पत्नी अश्विनी म्हात्रेसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. ही घडामोड शिंदेंचे सुपुत्र खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी देखील धक्का देणारी मानली जात आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण राज्यात ऑपरेशन कमळ राबवण्याची घोषणा केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे टेन्शन वाढवले आहे.