मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोघा आरोपींनी पोलिसांना चकवा देत पळ काढला

0

जळगाव । अमळनेर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अंबालाल भूरट्या खरर्डे आणि हिम्मत उर्फ रेहज्या पावरा (रा. सातपिंप्री ता. शहादा जि. नंदुरबार) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नंदुरबार कारागृहात नेताना आरोपींनी पोलिसांना चकवा देत पळ काढला. ही घटना धावडे गावाजवळ घडली आहे.

या घटनेबाबत असे की, अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरातून २४ दुचाकी चोरणारे हिंम्मत रेहंज्या पावरा व अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खर्डे या दोघाना अटक केली होती. या आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पोकॉ. अमोल पंडित करडईकर आणि यशकुमार रवींद्र सपकाळे हे या दोघांना घेऊन सरकारी वाहनातून नंदुरबार मध्यवर्ती कारागृहाकडे जात होते. धावडे गावापुढील हॉटेल नयनजवळच्या चहाच्या टपरीजवळ गाडी आली असता,आरोपी हिंमत पावरा याने अचानक ‘चक्कर येत आहे’ असे सांगून बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. पोलिसांनी त्याला बाटलीतून पाणी पाजले आणि तोंडावर पाणी मारले. तरी तो शुद्धीवर येत नसल्याचे पाहून, पोलिसांनी त्याच्या हातातील बेडी काढली. याचवेळी अंबालाल खर्डे यानेसुद्धा तसाच प्रकार केला.

पोलिस पाणी पाजून मदत करण्याचा प्रयत्न करत असताना, अंबालालने अचानक सरकारी वाहनाचा दरवाजा उघडला आणि बेडीला झटका देऊन पळ काढला. तो पळत असताना, हिंमत पावरा यानेही दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्का दिला आणि पळून गेला. पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग केला; परंतु दोन्ही आरोपी गर्दीचा आणि परिसराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले. पोकॉ. अमोल करडईकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.