बिहारमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केला

0

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने बहुमताचा आकडा पार केला असून ते १८८ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाआघाडी ६० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएने आरजेडीचा सुपडा साफ केला. आरजेडीला बालेकिल्ल्यातच भाजपने मोठा धक्का दिला आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राघोपुर मतदारसंघात सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर आता मागे पडले आहेत. सध्या भाजपचे सतीश कुमार १२०० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव राघोपुर जागेवर १२७३ मतांनी मागे पडले आहेत. मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच तेजस्वी मागे आहेत.

दुसरीकडे, आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप हे महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राजदमधून वेगळे होऊन स्वतःची पक्ष काढणारे तेज प्रताप यादव महुआ जागेवर चौथ्या क्रमांकावर आहेत. या जागेवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे उमेदवार संजय कुमार सिंह साडेतीन हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

आरजेडीमधून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी आपली नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘जनशक्ति जनता दल’ आहे. आरजेडीचे उमेदवार मुकेश रोशन हे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मानले जात आहेत, जे मागच्या वेळी या जागेवरून विजयी झाले होते. दरम्यान, राज्यातील २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.