बुलढाण्याच्या काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू
मुंबई । बुलढाण्याच्या चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वेतून पडून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सत्येंद्र भुसारी हे काही कामासाठी मुंबईला आले होते. काम आटोपल्यानंतर ते रेल्वेने चिखलीकडे निघाले होते. पण कसारा घाटात काळाने घाला घातला. मुंबईवरून चिखलीकडे परतत असताना कसारा घाटात रेल्वेतून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ज्या रेल्वेगाडीतून हा अपघात झाला ती गाडी कासारा स्टेशनवर थांबत नव्हती. नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


दरम्यान डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.