जळगावसह महाराष्ट्रात ‘गुलाबी थंडी’ची चाहूल; यंदा हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता
जळगाव/मुंबई । अवकाळी पावसाने उघडीप घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात ‘गुलाबी थंडी’ची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि वाढलेल्या हवेच्या दाबामुळे उत्तर-पूर्वेकडून थंड वारे आता राज्याकडे सरकू लागले आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका वाढणारअसा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. मागील २५ वर्षातील ही सर्वाधिक थंडी असेल, असेही काही जणांकडून सांगण्यात येत आहे.
हवमान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात हळूहळू घट होत आहे. पुढील काही दिवसांत दिवसांत हे प्रमाण आणखी वाढू शकते. पावसाने काढता पाय घेतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हळूहळू राज्यात थंडीचं आगामन होणार आहे.


गेल्या काही दिवसात राज्यातील विविध शहराच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. पुढील पाच ते सहा दिवसात राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशाने घट होण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. म्हणजे, पुढील आठवड्यापासून राज्यत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते, अशा अंदाज वर्तवला आहे. ला निनाच्या प्रभावामुळे यंदा थंडीचा लाट येऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातही गुलाबी थंडीची चाहूल
जळगाव जिल्ह्यात दिवाळीपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यादरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ उतार त्यात उकाडा वाढला होता. जळगावकर थंडी कधी वाढणार याची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान आता जिल्ह्यातील अवकाळी पावसाची परिस्थिती आता पूर्णपणे संपल्यामुळे, जिल्ह्यात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम म्हणून उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले असून यामुळे जळगावकरांना आता थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. आगामी दिवसात जळगावमधील किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका जळगावकरांना जाणवणार आहे.