स्थानिक निवडणुकीसाठी भाजपने जळगाव जिल्ह्यातील यांच्यावर सोपविली जबाबदारी
जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या प्रभारीपदी मंत्री संजय सावकारे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर जळगाव शहरासह जळगाव पूर्व व पश्चिमसाठी स्वतंत्र निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे.


यात जळगाव शहरासाठी प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे, जळगाव पूर्व अर्थात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नंदू महाजन तर जळगाव पूर्व अर्थात जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. जिल्ह्याचे भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. एकंदर भाजपत निवडणुकीसंदर्भातील निर्णयात आता भोळे, चव्हाण व महाजनांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
दरम्यान निवडणूक आयोगानं 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.