महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवार, ४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.


३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
या माध्यमातून एकूण 6 हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदाांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून 105 नगर पंचायतीची अजून मुदत संपलेली नाहीये.
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
अर्ज दाखल १० नोव्हेंबर
अंतिम तारीख १७ नोव्हेंबर
छाननी – १८ नोव्हेंबर
माघारी घेण्याची मुदत – २५ नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह नेमूण देणं – २६ नोव्हेंबर
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५