मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता
मुंबई । अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यात नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच त्यावेळेपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.


सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्ष आपापल्या स्तरावर तयारीला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवरून, दुबार मतदार यावरुन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने ही फेटाळल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच निवडणूक आयोग हे कोर्टाने दिलेल्या वेळेत निवडणुका घेण्यावर ठाम असल्याचे बोलल जात आहे.
दरम्यान आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का, संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल, आचारसंहिता कधी लागू होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयोग निवडणुकांचे बिगुल वाजवणार का, हे स्पष्ट होईल.
राज्यातील निवडणुका ३ टप्प्यात होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत या निवडणुका घेईल, अशी योजना आखत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जातो.