जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा इशारा ; ६ तारखेनंतर थंडीची चाहूल
जळगाव/मुंबई । दिवाळीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे काढणीवर आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावासाचा मोठा इशारा दिला असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत. आज सोमवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालं आहे. आज बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच जळगाव जिल्ह्यातही आज सोमवारी आणि मंगळवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


थंडीची चाहूल 6 नोव्हेंबरनंतरच
नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीचा काही नामोनिशाण दिसत नाहीये. येता जात पडणाऱ्या पावसामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच लागेल. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे.