चाळीसगाव-कन्नड घाटात दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या कुटुंबाला लुटले
जळगाव : चाळीसगाव ते कन्नड घाटदरम्यान पाचोरा येथील एका डॉक्टरांच्या कुटुंबाला लक्ष्य करत सात ते आठ दरोडेखोरांनी १ लाख २० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचोरा येथील रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. योगेश नेताजी पाटील यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचारासाठी पुण्याकडे रवाना झाले होते. शुक्रवार, २५ ऑक्टोबर रोजी रात्री ते पत्नी नूतन पाटील, भाऊ दिनेश पाटील, दाजी भरत पाटील आणि चालक भूषण पाटील यांच्यासह बेलेनो (MH 19 CB 6486) या कारने निघाले.


याच दरम्यान पहाटे चाळीसगाव-कन्नड घाटातील रांजणगाव फाटा, नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या गाडीला खालून काहीतरी अवजड वस्तू लागल्याने इंजिनमधून धूर येऊ लागला. गाडी थांबवून त्यांनी तपासणी सुरू केली असता, अचानक सात ते आठ मुखवटाधारी चोरटे त्यांच्या दिशेने धावत येताना दिसले.
दरोडेखोरांनी कुटुंबाला धमकावून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने घेतला. यावेळी त्यांनी चालकाचा मोबाईलही तोडून टाकला. “गाडीत बसा आणि निघा,” अशी धमकी देत हे चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.डॉ. योगेश पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.