दिवाळीवर पावसाचे सावट, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव । महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर आता काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. हवामान खात्यानं आज 19 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट?
रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. उन्हाची ही झळ तापदायक ठरत आहे.
राज्यात पावसाची उघडीप असली तरी कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३५ पार पोहोचला आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’चा ताप वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे.