शिरसोलीच्या तरुणाचा नेव्हरे धरणात बुडून मृत्यू

0

जळगाव । तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील नेव्हरे परिसरात असलेल्या नेव्हरे धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार (दि.15) रोजी सकाळी घडली. शरद राजाराम सुने (वय ३१, रा. शिरसोली प्र. न.) मयत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरसोली येथे राहणारा मृत तरुण शरद हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. आज बुधवारी (दि.15) सकाळी साडेनऊ वाजता शरद सुने हा भिका वसंत शिंपी (वय ४५) आणि अशोक सखाराम भिल (वय ५०) या मित्रांसह पोहण्यासाठी नेवरे धरणात गेला होता. मात्र पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

त्यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी गावात धाव घेत स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना माहिती कळवली. त्यानंतर ग्रामस्थांच्या आणि पोहण्यात पटाईत असणाऱ्यांच्या मदतीने शरदला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शरदच्या कुटुंबात आई-वडील असून तो एकुलता एक कर्ता मुलगा असल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.घटनेमुळे शिरसोली गावात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.