मुक्ताईनगरातील रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; एक लाखांची लूट
मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यात तळवेल गावाजवळ असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत लाखो रुपयांची रोकड लुटून नेली आहे. प्रकाश माळी आणि दीपक खोसे, अशी मारहाण झालेल्या पंपावरील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या या पेट्रोल पंपावर गुरूवारी साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवर पाच जण आले होते. त्यांनी आजुबाजुला कोणी नाही हे लक्षात घेऊन पंपावरील माळी आणि खोसे या दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्याला गावठी बंदूक लावून जवळपास एक लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडून हिसकावून घेतली. तसेच पंपाच्या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलीस पेट्रोल पंपावर दाखल झाले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर त्यांच्या दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी पाचपैकी 3 दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. मात्र, उर्वरित 2 दरोडेखोर पोलिसांच्या हातून निसटले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची कसून चौकशी सुरू केली असून, त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांनाही लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.