जळगाव पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन; ८४ हून अधिक गुन्हेगार अटकेत

0

जळगाव । सणासुदीचा काळ आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात आज गुरुवारी पहाटे पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालल्या या ऑपरेशनमध्ये हद्दपार गुंड आणि पाहिजे असलेले कुख्यात गुन्हेगार असे मिळवून एकूण ८४ हून अधिक गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांच्या या झटपट कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

आज पहाटेच्या शांततेत पोलिसांनी जळगाव शहर, जिल्हापेठ, तालुका, रामानंद, एमआयडीसी, शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत शहराच्या कानाकोपऱ्यात एकाचवेळी धडक कारवाई केली. या कारवाईत अटकेत असलेल्यांमध्ये हद्दपार केलेले, इतर गुन्ह्यांमधील फरार असलेले, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि दारू विक्रेते यांचा समावेश आहे.

हे सर्व गंभीर गुन्हेगार संबंधित पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः, विनापरवानगी हद्दपार असताना शहरात पुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शन

जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या कारवाईचे नियोजन केले. या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर ल, एमआयडीसीचे बबन आव्हाड, जिल्हापेठचे प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे आणि रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.