धक्कादायक : जळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला बेदम मारहाण, कानाचा पडदा फाटला
जळगाव । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या हल्ल्यात कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ.मोहित दीपक गादिया रक्तबबाळं झाले. मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटल्याने त्यांना काही आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ.मोहित गादिया हे कनिष्ठ निवासी म्हणून सेवा देत असून शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भादली येथून फटाका फुटल्यामुळे किरकोळ जखमी झालेले चार महिला व पुरुष उपचारासाठी रुग्णालयात आले होते. उपचारादरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्यामुळे डॉ. गादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गर्दी न करण्याबद्दल व बाहेर जाण्याबद्दल विनंती केली.
विनंतीचा राग आल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉ. मोहित गादिया यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर सहकारी डॉक्टरांनी धाव घेऊन डॉ. गादिया यांना नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले. दरम्यान, रुग्णालयात जमाव जमत असल्याचे पाहून संबंधित नातेवाईक रुग्णाला घेऊन खासगी दवाखान्यात निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. प्राथमिक तपासणीत, कानशिलात बसल्यामुळे डॉ. गादिया यांचा कानाचा पडदा फाटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.