जळगावच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा क्षेत्र अधिकारी लाच घेताना जाळ्यात !

0

जळगाव । जळगाव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला १५ हजाराची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली संशयिताच्या कार्यालयातील बॅगेत सापळा कारवाई दरम्यान सुमारे सव्वादोन लाखांची रोख रक्कम सुद्धा सापडली.

राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (४२, रा. पंचवटी, नाशिक) आणि खासगी पंटर मनोज बापू गजरे, अशी १५ हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या संशयितांची आहे. दोघांच्या विरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार रावेर येथील एका रूग्णालयात व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. संबंधित रूग्णालयाच्या मालकाने १६ मार्च रोजी जैविक कचरा संबंधीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी जळगाव येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, तक्रारदाराने केलेल्या अर्जात क्षेत्र अधिकारी राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी त्रुटी काढल्या. त्यांनतर तक्रारदाराने जैविक कचरा संबंधीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अर्ज केला. त्यानुसार त्यांना सदरचे प्रमाणपत्र २८ ऑगस्ट रोजी प्राप्त सुद्धा झाले.

मात्र, नाशिक कार्यालयाने तक्रारदाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या जळगाव कार्यालयात पूर्वी केलेला अर्ज काढून घेण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार जळगाव कार्यालयात गेल्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांने त्यांच्याकडे त्यासाठी १५ रूपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. त्याप्रमाणे प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, क्षेत्र अधिकारी राजेंद्र सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी करून ती खासगी पंटर मनोज बापू गजरे यास देण्यास सांगितले. दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच घेतल्याची खात्री पटल्यानंतर सुर्यवंशी आणि गजरे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान एक बॅगेत सुमारे दोन लाख २६ हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे, शिपाई भूषण पाटील यांनी सदरची कारवाई यशस्वी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.