फैजपूर शहरातील पत्रकारांचे निवेदन : अवैध सट्टा- मटक्याचा धंदा तात्काळ बंद करावा मागणी

0

फैजपूर प्रतिनिधी

फैजपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध सट्टा- मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून अवैध धंद्यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे अनेक. कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, युवकांना या जाळ्यात ओढले जात आहे तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी फैजपूर शहरातील पत्रकारांनी एकत्र येत फैजपूर पोलिस स्टेशन येथे लेखी निवेदन सादर केले.

पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील प्रत्येक भागांमध्ये सट्टा-मटका उघडपणे सुरू असून पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अवैध धंद्यामुळे गरीब मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे. कष्टाने मिळवलेल्या पैशांची उधळपट्टी या व्यवसायात होत असून संपूर्ण समाजव्यवस्थेवर त्याचा दुष्परिणाम होत आहे.

पत्रकारांनी पुढे असेही नमूद केले की, सट्टा-मटका हा केवळ एक जुगार नसून त्यातून व्यसनाधीनता, घरगुती वाद, कुटुंबे उद्ध्वस्त होणे, चोरीसारखे गुन्हे वाढणे अशा अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे यावर पोलिस प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून कायमचा बिमोड करावा

या निवेदनावर समीर तडवी, फारुक शेख, सलीम पिंजारी, इदू पिंजारी, मयूर मेढे, प्रा उमाकांत पाटील, प्रा. राजेंद्र तायडे, राजू तडवी, शाकीर मलक, युनुस पिंजारी यांसह शहरातील अनेक पत्रकारांच्या सह्या आहेत. पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने कारवाई करून अवैध सट्टा-मटका व्यवसाय कायमचा बंद केला नाही तर पत्रकार संघटना लोकांच्या हितासाठी मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.

पत्रकारांच्या या ठाम भूमिकेमुळे फैजपूर पोलिस प्रशासनावर कारवाईचे दडपण आले असून, शहरात सुरू असलेल्या या अवैध धंद्याविरोधात काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

फैजपूर पोलिस स्टेशनला हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना देण्यात आले. पत्रकारांचे म्हणणे आहे की, जर पोलिस प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर पत्रकार संघटना उपोषणासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारतील. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक तेवढे टोकाचे पाऊल उचलण्यास ते मागे हटणार नाहीत. या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलिस प्रशासनान कोणती भूमिका घेतो याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.