जळगावात पोलिसांच्या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, काडतुसे जप्त; चौघांना अटक
जळगाव । अवैध शस्त्र घेऊन फिरणाऱ्या चार जणांच्या टोळीला शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि एक कार असा एकूण १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गेंदालाल मील परिसरात करण्यात आली असून या कारवाईची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकातील सफौ सुनिल पाटील, सतिष पाटील, अमोल ठाकूर व प्रणय पवार हे अंमलदार रात्र गस्तीवर असताना त्यांना गेंदालाल मिल परिसरातील माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर काही शस्त्रे घेवून इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना कळविल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ उमेश भांडारकर, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, भगवान पाटील भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ यांचे पथक रवाना केले. या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली.
संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३, रा. गेंदालाल मिल), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (वय ३१, रा. आझादनगर), शोएब अब्दुल सईद शेख (वय २९. रा. गेंदालाल मिल) व सौहील शेख उर्फ दया सीआयडी सद्दाम सलीम पटेल (वय २९, रा. शाहूनगर) या चौघांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडून १ पिस्टल त्यामध्ये चार जीवंत काडतूस तसेच दुसऱ्या पिस्टलमध्ये ६ जिवंत काडतूस आणि १ रिकामे मॅगझीन व कार असा एकूण १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांना संशयित हे जून्या वादातून घातपात करण्याच्या तयारीत होते. परंतू त्यापुर्वीच शहर पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. यातील मुख्य संशयित यूनूस उर्फ सद्दाम पटेल याच्याविरुद्ध खूनासह अन्य पाच गंभीर गुन्हे दाखल आहे.