लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मूहूर्त ठरला ; सरकारकडून निधी वितरित
मुंबई । नुकतेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. यानंतर आता लाडक्या बहिणींना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची आस लागली आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मूहूर्त ठरला आहे. राज्य सरकारकडून ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य शासनाने मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती, पण सरकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात २ कोटी ४८ लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. आतापर्यंत जुलपर्यंतचे दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
मात्र, ऐन गणेशोत्सवात ऑगस्टचा हप्ता मिळेल, अशी आशा महिलांना होती. मात्र, असं काहीच झालं नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. दरम्यान, सप्टेंबर महिना सुरु होऊनदेखील १० दिवस झाले. त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करीत चालू आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये या योजनेसाठी एकूण ३९६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.