जळगावमध्ये हतनूरचा विसर्ग वाढला… १८ दरवाजे पूर्णपणे उघडले !

0

जळगाव । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला असून, धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. परिणामी आज सकाळी हतनूरचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून यामुळे तापी नदीला पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्य प्रदेशात आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे तापी तसेच पूर्णा नद्यांना मोठा पूर आल्यामुळे १५ दिवसांपूर्वी हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. वाढलेल्या पाणी पातळीमुळे धरणाचे ४१ पैकी २४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते, तर सहा दरवाजे एक मीटरने उघडले होते. यामुळे प्रतीसेकंद ४,९७१ क्युमेक्स म्हणजेच एक लाख ७५ हजार ५५१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर मात्र पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी होऊन पाण्याची आवक कमी झाली. परिणामी, हतनूर धरणाचे बहुतांश दरवाजे बंद करण्यात आले.

दरम्यानच्या काळात कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरूच राहिल्याने तापीच्या पात्रात बऱ्यापैकी पाणी पातळी कायम होती. बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याचे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने हतनूरचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पर्जन्यमापन केंद्रांवर घेण्यात आलेल्या नोंदीनुसार बऱ्हाणपुरात १.८, देढतलाईत ९६.८, टेक्सात ६.४, गोपालखेड्यात १०.६, चिखलदऱ्यात ४७.४, लखपुरीत २२.४, लोहाऱ्यात ५.६, अकोल्यात ४.० मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. पाणलोट क्षेत्रात एकाच दिवसात एकूण १९५ मिलीमीटर (सरासरी २१.६ मिलीमीटर) पाऊस पडल्याने हतनूरच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली.

दरम्यान, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर शेळगाव बॅरेजचे सहा दरवाजे दीड मीटरने आणि तीन दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले. ज्यामुळे तापी नदीला मोठा पूर आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.