मोठी बातमी..! संजय सावकारेंची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी, पंकज भोयर नवे पालकमंत्री
महायुती सरकारने सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.
त्यांच्या जागी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सावकारेंच्या डिमोशनमागील कारणांची चर्चा जोरात सुरू आहे.
शासन आदेशाने खळबळ
सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी जारी केलेल्या शासन आदेशानुसार, भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून संजय सावकारे यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी वर्धा जिल्ह्यातील पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावकारे यांना आता बुलढाण्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भंडाऱ्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्रीपदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय?
संजय सावकारे यांच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्यामागे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमधील तीव्र नाराजी हे प्रमुख कारण मानले जाते. सावकारे, जे जळगाव येथील रहिवासी आहेत, भंडारा जिल्ह्यात फारसे सक्रिय नव्हते. त्यांचा दौरा केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा जिल्हा नियोजनाच्या बैठकींपुरता मर्यादित होता. यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहिल्या होत्या. विशेषतः भंडाऱ्यातील पूरपरिस्थितीनंतरही सावकारे यांनी जिल्ह्याला भेट दिली नाही, ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.
नागरिकांनी स्थानिक किंवा जवळच्या जिल्ह्यातील नेत्याला पालकमंत्रीपद देण्याची मागणी सातत्याने केली होती. सावकारे यांचा जिल्हा विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात कमी पडलेला दृष्टिकोन आणि त्यांचा भंडाऱ्याशी असलेला तुटलेपणा यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष वाढत होता. याशिवाय, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भंडाऱ्यातील वाढती ताकद भाजपसाठी चिंतेचा विषय ठरली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सावकारेंना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी
पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्यातील असून गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्यावर आता भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भंडारा आणि वर्धा हे जवळचे जिल्हे असल्याने भोयर यांना स्थानिक समस्यांची चांगली जाण आहे, असे मानले जाते. आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भोयर यांच्यावर ही जबाबदारी सोपवून पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भोयर यांच्याकडून नागरिकांना विकासकामांना गती आणि प्रलंबित समस्यांवर त्वरित उपाययोजनांची अपेक्षा आहे.