चाळीसगाव येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सोहळा संपन्न
जळगाव |
चाळीसगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळणार असून हा निर्णय क्रांतिकारी ठरेल. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी दीपस्तंभ आहे. या स्मारकामुळे एक प्रेरणादायी वास्तू समाजास लाभली असून तिच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, योग्य नेतृत्व, ठाम भूमिका व सकारात्मक शासन असेल तर अशक्य काहीही नाही. स्मारक म्हणजे केवळ इतिहासाचा सन्मान नसून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे शिलालेख आहे. तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी स्मारकासाठी एक कोटी ऐवजी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती, ज्याचा पाठपुरावा आमदार मंगेश चव्हाण यांनी करून अवघ्या ४८ तासांत शासन निर्णय काढण्यात यश मिळवले, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, महात्मा फुले स्मारक समितीचे सदस्य, मोठ्या संख्येने चाळीसगावमधील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. पुण्याचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून चाळीसगावच्या समाजबांधवांची ही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगितले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या मनोगतात स्मारक उभारणीचा घटनाक्रम सांगितला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजात प्रेरणेची फुले उधळण्याचे काम या स्मारकातून झाले आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या हिंगोणे गावातील जिल्हा परिषद शाळा क्लस्टर मॉडेल स्कूल स्वरूपात उभारून तिला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची घोषणा त्यांनी केली.
प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले. यावेळी उद्धवराव महाजन, डॉ. संजय माळी, सचिन महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.