जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

0

जळगाव । आदिवासी पारंपारिक नृत्य… विश्वगर्जना युवा सदस्यांचे ढोलताशांच्या वादनासह सादरीकरण, पारंपरिक संबळ वाद्यावर कंपनीच्या विविध ठिकाणी कामावर असलेल्या सालदारांचे नृत्य… कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक.. जैन हिल्सवरील पारंपारिक पोळा सण.. डोळ्यांचे पारणे फेडत होता. अशोक जैन यांच्यासह शहरातील मान्यवरांसह अनुभूती स्कूल व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी २९ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याची पद्धत सुरू केली होती. यावेळी नव्या पिढीला भारतीय कृषि संस्कृती अनुभवता यावी, त्याचे महत्त्व समजावे या मुख्य हेतुने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, शहरातील मान्यवरांना हा उत्सव अनुभवण्यासाठी आवर्जून आमंत्रित केले जाते.

जैन हिल्स येथील ध्यानमंदीर येथे कृषी संशोधन प्रात्याक्षिक केंद्राच्या शेती विभागाच्या विविध ठिकाणाच्या सालदार मंडळींनी बैलांना एकत्र करून त्यांना पोळ्यासाठी तयार केले. तेथूनच सवाद्य मिरवणूक निघाली. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ ‘श्रद्धा ज्योत’ येथे भाऊंच्या स्मृतिंना अभिवादन केले गेले. मारुतीच्या मंदिराचे दर्शन घेऊन सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे निघालेली सवाद्य मिरवणूक जैन हिल्स हेलीपॅडच्या मैदानात पोहोचली. यावेळी अशोक जैन यांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून बैल पोळाची सुरवात झाली.

अविनाश गोपाळ, हंसराज जाधव यांना पोळा फोडण्याचा मान

हा पोळा अजून द्विगुणीत व्हावा यासाठी कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेने यावर्षी पोळा फोडण्याच्या रोख पारितोषिकात वाढ करण्यात आली होती. त्यानुसार यावर्षी २० हजार रुपयांचे रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत झाले. त्यात जैन वाडा येथील सालदार हंसराज थावरस जाधव, अविनाश गोपाळ यांना पहिला मान मिळाला. हंसराजने यावर्षी सलग चौथ्यांदा पोळा फोडण्याचा मान मिळविला आहे. त्यांना प्रत्येकी (रोख ५ हजार रुपये) तर जैन सोसायटीचे दिलीप पावरा, साजन पावरा यांना दुसरा मान मिळाला (प्रत्येकी २ हजार रुपये) तर उर्वरित सहा जणांना तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला. त्यात गोविंद पावरा, भगवान सावळे, वाल्मिक शिंदे, किशोर शिंदे, रामसिंग पवार यांना गौरविण्यात आले.

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी प्रथमत: अशोक जैन व सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सौ. ऐश्वर्या रेड्डी, जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, डॉ. शेखर रायसोनी, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, महाराष्ट्र राज्य क्रेडाईचे उपाध्यक्ष अनिश शहा, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, स्वरुप लुंकड, पारस राका, गोटूशेठ बंब, नंदलाल गादीया, माजी नगरसेवक अमर जैन, डॉ. उल्हास पाटील फिजोथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, नॅचरोपॅथीच्या डॉ. कल्याणी नागूलकर, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील शेतकरी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते सालदारगडींचा सपत्नीक सन्मान

जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते. वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा अव्याहत सुरू ठेवली आहे. त्यात कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, भाऊंची सृष्टी, जैन सोसायटी शिरसोली इत्यादींचा समावेश आहे. ३१ सालदार गडी आणि ३२ हून अधिक बैलजोडी काळ्या मातीमध्ये राबत असते. त्या सर्व सालदारगडींचा भेटवस्तु देऊन सपत्नीक गौरव मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. अशोक जैन, ज्योती जैन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, सेवानिवृत्त वन अधिकारी राजेंद्र राणे, डॉ. इंगळे, विजयसिंग पाटील, डॉ. कल्याणी मोहरीर, प्रो. गीता धरमपाल आदी मान्यवरांच्याहस्ते गौरव झाला. किशोर कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

आदिवासी नवाय गरभा नृत्याने आली रंगत…

यावल तालुक्यातील निंबादेवी धरणाजवळ असलेल्या रोशनबर्डी येथील वालू सोनासिंग बारेला यांच्या कलापथकाने पारंपरिक आदिवासी नृत्य आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले. विशेष म्हणजे या कलापथकाच्या मालकीची २० एकर जमीन असून त्यांनी गेल्यावर्षी जैन इरिगेशनने विकसीत केलेल्या जैन स्वीट ऑरेंजची लागवड केली आहे. या पथकाने आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी कुठलेही मानधन न घेता पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकी एक फळझाड द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या पथकाच्या सदस्यांनी रोपे स्वीकारली.

ढोलताशांची विश्वगर्जना…

जळगावातील विश्वगर्जना युवा सदस्यांच्या ढोल पथकातील १०० वादकांनी तालबद्ध वादन करुन उपस्थीतांची मने जिंकली. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा जल्लोष केला. शिरसोली येथील बॅन्ड बथकाच्या वाद्यावर अॅग्री टास्क फोर्स, सालदार मंडळी आणि सहकाऱ्यांनीही संबळावर नृत्याविष्कार सादर केला. विशेष महत्त्वाचे म्हणजे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी वाद्याच्या तालावर ठेका धरून आपला आनंद व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.