भुसावळात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात पकडले
भुसावळ । भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना दोन हजार रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईने जळगाव पोलिस दलातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत असे की, एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले असून हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून दोन हजाराची लाच स्वीकारताना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.