जळगावात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा
जळगाव । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वीच जळगावमध्ये काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे प्रतिभा शिंदे उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ४५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे (इंटक) विभागीय अध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी राजीनामा दिला. भगतसिंग पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा तसेच इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्याकडे विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी पाठवून दिला आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीला आणि निष्क्रियतेला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी राजीनाम्यात स्पष्टपणे नमूद केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची चांगली ताकद वाढण्याची आशा काँग्रेस बाळगून होती. प्रत्यक्षात, दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळालेल्या प्रतिभा शिंदे यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन काँग्रेसला धक्का दिला. दरम्यान, शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याची कारणी मिमांसा करताना काँग्रेसमधील राज्याच्या धुरिणांवर जोरदार टीका केली आहे.
प्रतिभा शिंदे यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिल्यानंतर काँग्रेसमधील गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली. शिंदे यांच्यानंतर भगतसिंग पाटील पाटील यांनीही राजीनामा दिला आहे.
आज माझ्यासाठी हा अत्यंत कठीण आणि भावनिक क्षण आहे. कारण मनावर दगड ठेवून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. गेली ४५ वर्षे मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले. माझे राजकीय आयुष्य, माझे योगदान आणि माझी निष्ठा, हे सर्व या पक्षासाठी संपूर्णपणे समर्पित राहिले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्थानिक व जिल्हास्तरीय नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी, कुरबुरी, भेदभाव आणि अपमानास्पद वागणुकीमुळे पक्षात काम करणे कठीण झाले होते. एकजूट, सन्मान आणि विचारांना स्थान असलेले वातावरण हळूहळू हरवत चालले होते. आणि अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये काम करणे शक्य नसल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे भगतसिंग पाटील यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे नवीन पक्ष, नवीन दिशा, पण जुन्याच मूल्यांसह सुरू राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.