राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या असून, त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या प्रभाग रचनेवर काही राजकीय पक्ष व व्यक्तींनी आक्षेप घेत याचिका दाखल केल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिका फेटाळल्यानंतर आता या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे लवकरच निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करू शकतो.
या नव्या रचनेनुसार मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड अशा प्रमुख महापालिकांमध्ये प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांवरून विरोध झाला असला, तरी आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट झाली आहे.पुणे कॉफ़ी शॉप
यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, प्रभाग रचना ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या रचनेनुसारच होतील. त्या निर्णयानंतर पुन्हा एकदा एक याचिका दाखल झाली होती, पण तीही न्यायालयाने फेटाळली.
यामुळे आता ओबीसी आरक्षण लागू करून नव्या प्रभाग रचनेनुसार महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग येण्याची चिन्हं आहेत.