उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल्लोषात शुभारंभ

0

जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !- पालकमंत्री गुलाबराव पाटील

▪️ पालकमंत्र्यांनी सफारीचे पाच हजार रुपये देऊन दोन तिकीट केले बुक

जळगाव | “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा; कारण हा श्वास जगण्याचा आनंद शिकवतो,” असे भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातपुडा जंगल सफारीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जंगल सफारीत तब्बल दीड तास सहभाग घेत परिसराचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत आमदार अमोल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन विभागातर्फे पालकमंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सफारीदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती जाणून घेतली.

आमदार अमोल जावळे म्हणाले, “पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून खानदेशातील ही पहिली जंगल सफारी उभारली गेल्याचा अभिमान आहे. येथील निसर्ग जतन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. या परिसरात ‘डार्क स्काय पार्क’ची उभारणी व्हावी, अशी विनंती मी मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्र्यांनी केली पहिली बुकिंग
जंगल सफारीसाठी एका गाडीचे तिकीट अडीच हजार रुपये आहे. पालकमंत्री यांनी पाच हजार रुपये देऊन दोन गाड्याचे बुकिंग केले. या अर्थाने ते पहिले पर्यटक ठरले. यानंतर दीड तास पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्यासह या जंगल सफारीचा आनंद घेतला.

पाल अभयारण्यातील आकर्षण
सातपुडा पाल अभयारण्यात पर्यटकांसाठी अनेक निसर्गसंपन्न आणि अनुभवसमृद्ध ठिकाणे आहेत. यामध्ये लेक व्ह्यू पॉईंट हे विशेष आकर्षण ठरते. डोंगराच्या उंचावरून तलावाचे मोहक दृश्य पाहता येते. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इको हट पॉईंट हे पर्यावरणपूरक विश्रांतीस्थान असून बांबू आणि स्थानिक नैसर्गिक साहित्य वापरून बांधलेल्या झोपड्यांमध्ये बसण्याची सोय आहे. हे ठिकाण कुटुंबासह शांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे. याशिवाय, सनसेट पॉईंट हे सायंकाळच्या वेळेस अप्रतिम सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचावरून दिसणारा डोंगराळ भाग, घनदाट जंगल आणि मावळणारा सूर्य यांचे दृश्य मनाला मोहवणारे असते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य आहे. याशिवाय, वाघडोह हे ठिकाण जंगल सफारीतील सर्वात रोमांचक भाग मानले जाते. येथे वाघ, बिबट्या यांच्यासह विविध वन्यजीवांचा अधिवास असून, वन्यप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. वनविभागाच्या मार्गदर्शकांसह ही ठिकाणे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेली ही अभयारण्यसंपन्न जागा जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरण पर्यटन आणि स्थानिक रोजगारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे ₹2.5 कोटी निधीतून पूर्ण करण्यात आला असून, प्रारंभी फक्त मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाच सफारी वाहने, १८ प्रशिक्षित गाईड आणि चालकांची नियुक्ती यांचा समावेश आहे. जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले. उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी प्रास्ताविकात जंगल सफारीची सविस्तर माहिती दिली, तर सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.