जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी

0

जळगाव | जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी झाली आहे. आठ मुलं व आठ मुलींच्या १६ लाईव्ह बुद्धिबळ पटांसह तब्बल २७५ टेबलांवर बुद्धिबळपटू आपल्या मोहरांच्या चाली खेळणार आहेत.

या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्या २ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. त्यांच्यासमवेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे व जैन स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जळगाव बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादीया असतील.

राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी

पहिल्यांदाच भव्य स्वरूपात होत असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान राज्यातील ५५० च्यावर खेळाडू सहभागी झाले आहेत. यातील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा यात समावेश घेतला आहे. त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल (२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले खेळाडू यात आहे. या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी असल्याने स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रेल्वेस्थानकाजवळ विशेष कक्ष..

जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे जळगाव रेल्वे स्थानकाजवळ खेळाडूंसाठी विशेष कक्ष उभारला असून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे स्वागत केले व निवास व इतर व्यवस्थेबाबत त्यांना माहिती दिली.

आठ लाखांच्या पारितोषिकांसोबतच मुल्यांकनानुसार रोख बक्षिसे..

११ फेऱ्यांमध्ये २७५ बुद्धिबळ पटांवर भव्य स्वरूपात ही स्पर्धा रंगणार आहे. ११ वर्षांखालील मुलं-मुलींच्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत ८ लाखाची बक्षिसे आहेत. वैयक्तीक स्वरुपाचे विजयी, पराजित व बरोबरीत असणाऱ्या सर्व खेळाडूंना रोख स्वरूपात विशेष पारितोषिके त्यांच्या खेळाच्या मुल्यांकनानुसार दिले जाणार आहेत. अशा प्रकारची बक्षिसे फक्त जळगावातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या माध्यमातून दिली जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.