आज राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या
मुंबई : राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस सुरु आहे. यातच हवामान खात्यानं आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 30 जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषत: पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या भागांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना सध्या कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या भागांसाठीही कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भाला यलो अलर्ट
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 30 जुलै रोजी यलो अलर्ट असलेल्या 15 जिल्ह्यांतील नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, असे हवामान विभागाने सुचवले आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.