त्या आरोपावर एकनाथ खडसे यांचं आमदार मंगेश चव्हाणांना ओपन चॅलेंज

0

जळगाव । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅपच्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. या प्रकरणात जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून या व्यक्तीबाबत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यातच खडसेंकडून मंत्री महाजन यांच्यावर होणाऱ्या आरोपावरून भाजप आमदारांनी जळगावमध्ये खडसेंविरोधात एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विशेष एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांना थेट आव्हान केलं. खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना आपल्या विरोधातील एक तरी पुरावा सादर करुन दाखवावा, आपण राजकारण सोडायला तयार आहोत, असं चॅलेंज खडसेंनी दिलं आहे.

“मूळ प्रश्न असा आहे की, काल पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद मुळामध्ये हनीट्रॅप प्रकरण आणि प्रफुल्ल लोढा याला अटक करण्याबाबत होती. पण त्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. फक्त नाथाभाऊला टार्गेट करत होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगेश चव्हाण यांनी चारित्र्याचा सर्वात मोठा आरोप नाथाभाऊंवर केला. मी मंगेश चव्हाण यांना आव्हान देतो. माझ्या विषयी पुराव्यानिशी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तर ती समाजाला दाखवा. गप्पा काय मारता? माझ्यासमोर दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईन. एक शब्द काढणार नाही. बाकी मी असा राजकारणातून निवृत्त होणार नाही. जनमाणसाचा प्रतिनिधी आहे”, असं खडसेंनी ठणकावून सांगितलं.

“मी 45 वर्षे जनमाणसात काम केलं आहे. जनतेचे प्रश्न विधानसभेत प्रखरपणे मांडलेले आहेत. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे साऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे अधिकार मला जनतेने दिले आहेत. जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत मी जनतेचे प्रश्न मांडणार आहे, भांडणार आहे, चालू ठेवणार आहे. तुम्ही पुरावे द्या, मी राजकारणातून निवृत्ती घेईन”, असं चॅलेंज एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.