नागपूर- नाशिक दरम्यान विशेष रेल्वे धावणार; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना होणार फायदा
नागपूर : नागपूरपासून नाशिक पर्यंत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेनं या मार्गावर दोन एकेरी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नागपूर ते नाशिक रोड दरम्यान विशेष अनारक्षित दोन ‘वन-वे ट्रेन’चे संचालन करण्यात येणार आहे. २३ आणि २४ जुलै २०२५ रोजी या गाड्या धावणार आहेत. विशेष म्हणजे ही गाडी जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबणार आहे.
ही विशेष गाडी २३ आणि जुलैला नागपूरहून रात्री ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीचा प्रवास सुमारे १० तासांचा असून मार्गातील विविध महत्वाच्या स्थानकांवर तिचे थांबे असणार असल्याने त्या-त्या भागातील प्रवाशांसाठीही या गाडीचा लाभ होणार आहे.
मार्गावरील थांबे
नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड ला या गाड्या थांबणार असल्याने विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. खासकरून नाशिकमधील यात्रा, व्यापारी तसेच धार्मिक पर्यटनामुळे होणारी गर्दी नियंत्रित करण्यास या गाड्यांमुळे मदत होणार आहे.
१८ अनारक्षित कोच
या गाडीमध्ये एकूण १८ अनारक्षित कोच असतील. त्यात १६ सामान्य तर २ एसएलआरडी कोचचा (गार्डसह लगेजची वाहतूक करणारे कोच) समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी पूर्णतः अनारक्षित स्वरूपात असल्यामुळे अगदी ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचे तिकिट काढता येणार आहे. या गाडीला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरच जाऊन तिकिट काढता येणार आहे.