महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानभवनात घडलेल्या हाणामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून, आव्हाड यांच्यावरील गुन्ह्यामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
नेमकं प्रकरण काय?
17 जुलै रोजी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत कॉलर धरणे, शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली, ज्यामुळे विधानभवनाच्या पवित्रतेवर काळिमा फासला गेला. आव्हाड यांनी दावा केला की, पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली आणि स्वतःला मारण्याचा नियोजित कट रचला गेला.
या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये नितीन देशमुख यांचाही समावेश होता. दरम्यान, नितीन देशमुख यांना पोलिसांनी विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अटकेविरुद्ध तीव्र आक्षेप घेत पोलिस गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
आव्हाड यांनी विधानभवनातील आमदारांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करत, “जर आमदारच सुरक्षित नसतील, तर आमदार होण्याचा काय उपयोग?” असा सवाल केला. या घटनेनंतर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परवानगीने दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.