जिल्हा नियोजनातील कामांची गुणवत्ता सुनिश्चित करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जळगाव । जिल्हा नियोजन व विकास समितीअंतर्गत मंजूर कामांची गुणवत्ता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांची विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता सुनिश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. त्यांनी सूचित केले की, पूर्ण झालेली कामे पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांच्या हस्ते १५ ऑगस्टपूर्वी उद्घाटन करून संबंधित यंत्रणांकडे हस्तांतरीत करावीत. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता न राहता, कामे प्रत्यक्ष वापरात येत आहेत याची खात्री होणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, “सर्व कामांमध्ये तांत्रिक गुणवत्ता आणि निकषांचे पालन झाले आहे का, यासाठी त्रयस्थ संस्थेकडून (Third Party) गुणवत्ता तपासणी अनिवार्य आहे. केवळ कागदोपत्री पूर्तता न मानता, कामे प्रत्यक्ष पाहणीने तपासावीत.”
बैठकीस उपवनसंरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, उपवनसंरक्षक प्रवीण, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपल्या प्रलंबित आणि प्रगतिपथावरील कामांचा सादरीकरणाद्वारे आढावा दिला.
शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी पारदर्शक खर्च, सार्वजनिक निधीचा कार्यक्षम उपयोग आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीच्या स्पष्ट सूचना दिल्या. “कामाच्या गुणवत्ते बद्दल तडजोड होणार नाही याची दक्षता घ्या,यासाठी सुरुवातीपासूनच दर्जा राखणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.