भडगाव तालुक्यातील जबरी चोरीचा छडा ; चौघांकडून ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त

0

भडगाव । भडगाव पोलिसांनी गोंडगाव रोडवर झालेल्या जबरी चोरीचा छडा लावला असून यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यांच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, फायनान्स कंपनीत फील्ड असिस्टंट मॅनेजर विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. भालगाव बु.), हे पथराड येथून गोंडगाव मार्गे चाळीसगाव येथील कार्यालयात जात असताना दोन अज्ञात आरोपींनी त्याला अडवून मारहाण केली. आरोपींनी त्याची मोटारसायकल लाथा मारून पाडली आणि त्याच्याकडील ₹५८,४०० रोख रक्कम, ₹५,००० किमतीचा सॅमसंग टॅब आणि ₹२,००० किमतीचे बायोमेट्रिक मशीन असा एकूण ₹६५,४०० किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तक्रारदाराच्या टॅबच्या शेवटच्या लोकेशनच्या माहितीनुसार बांबरुड प्र.ब. ता. भडगाव परिसरात तपास केला असता, पथराड गावातील काही तरुणांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोपाल संजय पारधी (वय ३२, रा. पथराड) याला १२ जुलै रोजी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर, १३ जुलै रोजी मयुर ज्ञानेश्वर साळुंखे (वय २२, रा. पथराड) याला अटक करण्यात आली. १४ जुलै रोजी अतुल नाना पाटील (वय २६, रा. पथराड) आणि कैलास वाल्मिक पाटील (वय २७, रा. पथराड) या फरार आरोपींनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी ₹३७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.