पुणे : एकीकडे राज्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसून अशातच आता काँग्रेलाही गळती लागल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे.
पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सासवडमध्ये भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे, या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप म्हणाले, पक्षप्रवेशाला वेळ झाला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायला उशीर झाला त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो, उर्वरीत पक्षप्रवेश काही वेळाने पूर्ण होतील. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असंही जगताप म्हणालेत. माझ्या स्वभावात दोष आहे मी कायम उशीरा पोहोचतो त्यासाठी यावेळी जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे, असंही यावेळी कार्यक्रमात संजय जगताप यांनी म्हटलं आहे. तिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही, इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो. या विचाराकडे येण्याचं माझं हेच कारण आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी आज पक्षप्रवेश केला आहे.