जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीचे भाव तेजीत
जळगाव । श्रावण महिना आणि आगामी काळातील सण-उत्सवांची चाहुल लागताच जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्यासह चांदीने उसळी घेतली आहे. चांदीच्या किमतीने दर इतिहास रचला आहे.
जळगावच्या सुवर्ण बाजारात सध्या सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख १ हजार २४९ रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह १ लाख १६ हजार ३९० रुपयांवर पोहोचले आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने १ लाख १६ हजारांचा आकडा पार केला.
सोने आणि चांदीच्या किमती वाढण्यास बरेच घटक जबाबदार धरले जात असले, तरी जागतिक आर्थिक अनिश्चितताही तितकीच कारणीभूत ठरली आहे. अमेरिका आणि युरोपमधील महागाईचा दबाव तसेच मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरांमधील संभाव्य बदलामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीला पुन्हा पसंती देऊ लागले आहेत.
याशिवाय, गणेशोत्सवासह इतर सणांचा काळ जवळ येत असल्यामुळेही सोन्याचे दागिने आणि नाण्यांची मागणी वाढली आहे. याशिवाय, औद्योगिक मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याने चांदीच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सौर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वापर वाढतच आहे. त्यामुळेही चांदीची मागणी वाढली आहे. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीचा कल देखील सोने आणि चांदी बाजाराला आधार देत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सोने दरात वाढ होत असली तरी वेगवेगळ्या कारणांमुळे सोन्याचे दागिने घेणे जरुरीचे ठरत असल्याने मागणी यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.