‘धरती आबा जनजातीय अभियान’ शिबिर आदिवासींसाठी भविष्याची दिशा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

“दारात शिबिर – हातात न्याय” या तत्वावर आधारित हे अभियान

जळगाव । “जसं महसूल खातं ‘समाधान शिबिर’ राबवतं, तसंच हे ‘धरती आबा जनजातीय अभियान’ आदिवासी बांधवांच्या दारी ‘न्याय’ घेऊन येत आहे. ‘फाईल गहाळ’, ‘कर्मचारी नाही’, ‘आज वेळ नाही’ – हे आता बंद झालं असून, शिबिरातच काम पूर्ण व्हावं, हीच शासनाची भूमिका आहे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते रिधुर येथे आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत तालुकास्तरीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ७८ हजार कोटींचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हे शिबिर म्हणजे आदिवासींसाठी वरदान असून त्यांच्या भविष्याची दिशा ठरवणारे ठरणार आहे, असेही ते म्हणाले.या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आदिवासी स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा (धरती आबा) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिराचे आयोजन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, “भिल्ल, पारधी, टोकरे कोळी व इतर अनुसूचित जमातीतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जातीचे प्रमाणपत्र तत्काळ द्यावे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. “दारात शिबिर – हातात न्याय” या तत्वावर आधारित हे अभियान वैयक्तिक, सामूहिक व पायाभूत सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी देणारे ठरत आहे. “शिक्षणच आदिवासी समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहे. वाटेल ते करा, पण तुमच्या मुलांना आणि मुलींना शिकवा!” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना भावनिक स्वरात केले.

राज्य शासनाच्या निधीतून १० शासकीय आश्रमशाळांसाठी ₹१४० कोटी व ३ वसतीगृहांसाठी ₹३६ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून १७ शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून डिजिटल शिक्षण सुविधा उभारण्यात आली आहे. ५ वसतीगृहांमध्ये अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ५० पारधी विद्यार्थ्यांसाठी १ महिन्याचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात असून १८ आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना इसरो ( अंतराळ संशोधन संस्था )सहलीचा अनुभव देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या शिबिराची सुरुवात बजरंगबली मंदिरातील सामूहिक आरतीने झाली. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रारंभी प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी शिबिराचे महत्त्व सांगत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकही पात्र लाभार्थी योजना वंचित राहू नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी भिल्ल, पारधी, टोकरे कोळी समाजातील पात्र लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रवीण पाटील यांनी तर प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, अरुण संदीप, तालुका प्रमुख विजयकुमार गाडे आणि त्यांच्या टीमने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.