पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात; जळगावात कारवाई, दोघेजण ताब्यात
जळगाव : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, दुचाकी व मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रामुख्याने ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहे. काही महिन्यांपूर्वी भुसावळमध्ये मोठी कारवाई झाली होती. यानंतर जळगाव शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन संशयित व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
पोलिसांनी दोघांकडून सहा हजार रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या १२ बनावट जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी एकूण ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथून आणल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी २४ हजार रुपये जळगावात खर्च केल्याची कबुली त्यांनी पोलिसांनी दिली. त्यांच्यासमवेत आणखी एक जण असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी आणखी एका संशयिताचे नाव सांगितले. त्यालाही अटक केली. तिघे जण पोलिस कोठडीत आहेत. दोघांनी २४ हजारांच्या म्हणजेच ४८ नोटा जळगाव शहरात विविध ठिकाणी खर्च केल्याची माहिती दोघांच्या चौकशीतून पुढे आली आहे.