महाराष्ट्रातील आठ ठिकाणी सुरू होणार ‘सी-प्लेन’ सेवा
महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारने ‘उडान 5.5’ योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत हेलिकॉप्टर आणि ‘सी-प्लेन’ (जलाशयात उतरणारे विमान) सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आठ ठिकाणी ‘एअरो ड्रोम’ (जलाशयातील तात्पुरती धावपट्टी) उभारण्याचा प्रस्ताव मांढण्यात आला आहे.
लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘उडान 5.5’ योजनेचा भाग म्हणून देशभरातील 150 जलस्थळांवर सी प्लेन सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासोबतच महाराष्ट्रातील आठ ठिकाणी ‘एअरो ड्रोम’ (जलाशयातील तात्पुरती धावपट्टी) उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला (MCA) सादर केला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक सुंदर ठिकाणांना हवाई मार्गाने भेट देणे शक्य होणार आहे.
प्राथमिक टप्प्यात ‘या’ ठिकाणांची निवड
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रासोबत केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप या ठिकाणांची ‘सी-प्लेन’ सेवा सुरू करण्यासाठी निवड केली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी असलेल्या नद्या आणि मोठ्या जलाशयांवरून ही हवाई वाहतूक सेवा सुरू केली जाईल. या प्रकल्पासाठी कॅनडातील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ या कंपनीची खास विमाने वापरली जाणार आहेत.
महाराष्ट्रात या 8 ठिकाणी सुरू होणार सी प्लेन
धोम धरण (वाई, सातारा)
गंगापूर धरण (नाशिक)
खिंडसी धरण (नागपूर)
कोराडी धरण (मेहकर, बुलढाणा)
पवना धरण (पवनानगर, पुणे)
पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)
गणपतीपुळे (रत्नागिरी)
रत्नागिरी (रत्नागिरी)