जळगावहून मुंबईला फक्त पाच तासांत पोहोचता येणार … समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली

0

जळगाव – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत झाला. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच, जळगावहून समृद्धी महामार्गावरून मुंबईला फक्त पाच तासात कसे पोहोचता येईल, त्यादृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड दरम्यानच्या वाहतुकीला अधिक गतीमान व सुलभ करण्याच्या दृष्टीने नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक रविवारी झाली. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

सद्यःस्थितीत जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अवघ्या एका तासावर आणण्याचे बैठकीत ठरले. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला समृद्धी महामार्गाने पोहचण्यासाठी चार तास लागतात. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाचा एक तास आणि पुढील प्रवासाचे चार तास गृहीत धरले तर केवळ पाच तासात जळगावहून मुंबईला पोहोचणे त्यामुळे शक्य होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.