जळगाव हादरलं! बापानेच पोटच्या पोराला संपवलं
जळगावमधील जामनेरमध्ये बापानेच पोटच्या पोराचा खून केल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री गावातील २५ वर्षीय शुभम धनराज सुरळकर याची हत्या करण्यात आली. शुभमला त्याच्या जन्मदात्या पित्यानेच निघृणपणे संपवलं. काका आणि भावाने शुभमला संपवायला मदत केल्याचे समोर आलेय. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मयताचे वडील धनराज सुपडू सुरळकर, भाऊ गौरव सुरळकर आणि काका हरिलाल सुरळकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याला दारूचे व्यसन होते. मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणांवरून घरात सातत्याने भांडणे करायचा आणि कुटुंबीयांना मारहाण करायचा. त्याच्या या वर्तनाला कुटुंबीय कंटाळले होते. याच त्रासातून संतापलेल्या वडील धनराज यांनी शुभम झोपलेला असताना रागाच्या भरात त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला. या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर धनराज यांनी आपला दुसरा मुलगा गौरव आणि भाऊ हरिलाल यांच्या मदतीने मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला. ही घटना गावात पसरताच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि प्राथमिक चौकशीत धनराज यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात या तिघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे उघड झाले.
या घटनेने कसबा पिंप्री गावात शोककळा पसरली आहे. शुभमच्या कुटुंबीयांचे दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेले जीवन आणि त्यातून घडलेली ही दुदैवी घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिस पुढील तपास करत असून, आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.