पंढरपूरच्या वारीसाठी जळगाव भुसावळामार्गे धावणार विशेष रेल्वेगाड्या
जळगाव । आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने पंढरपूरच्या वारीसाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १० जुलै यादरम्यान आषाढी वारीसाठी ८० विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये नागपूर स्थानकातून पंढरपूरसाठी ४ स्पेशल ट्रेन सुटणार आहेत.
पंढरपूर आषाढी एकादशी वारीसाठी होणारी भाविकांची गर्दी पाहून मध्य रेल्वेने या विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते मिरज दरम्यान चार विशेष गाड्या (01205/01206) चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या “ट्रेन ऑन डिमांड” (TOD) योजनेअंतर्गत चालवल्या जातील आणि त्यांचे भाडे सामान्य भाड्याच्या 1.3 पट जास्त असेल. 01205 नागपूर-मिरज विशेष गाडी ४ आणि ५ जुलै रोजी नागपुरातून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५० वाजता मिरजला पोहोचेल. 01206 मिरज-नागपूर विशेष गाडी ६ आणि ७ जुलै रोजी मिरजहून दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे १२.५५ वाजता नागपुरात पोहोचेल.
कोण कोणते थांबे असतील ?
अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव,जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग
स्पेशल ट्रेनची संरचना :
दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग आणि लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
बुकिंग कधीपासून सुरू होईल?
आषाढी विशेष ट्रेन क्रमांक 01205, 01206, 01119, 01120, 01121 आणि 01122 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दिनांक १६.०६.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल. अतिजलद मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानांसाठी सामान्य शुल्क आकारून अनारक्षित कोचची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतात.