जिल्हाधिकारी यांनी घेतली प्रभाग रचना व मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची बैठक
जळगाव | जळगाव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. आयुष प्रसाद हे होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अर्चना मोरे, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत शासनाकडून निर्गमित प्रभाग रचना आदेशावर सविस्तर चर्चा झाली. नव्याने प्रस्तावित प्रभागांची माहिती, मार्गदर्शन तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन या विषयांवर चर्चा झाली.
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “मतदार यादी अद्ययावतीकरण ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करून लोकशाही हक्क बजावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस जनजागृतीसाठी सर्व पक्षांनी सक्रीय सहभाग द्यावा.”
या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोरे यांनी मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, विलोपन आदी बाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पारदर्शक, सुसूत्र व शांततेपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.